Sunday, 28 June 2015

मधुराधिपतये अखिलम मधुरम् (बालगंधर्व) - पु.ल.देशपांडे

मधुराधिपतये अखिलम मधुरम् (बालगंधर्व) 



(बालगंधर्वाच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात 'पुलं'नी त्यांच्याविषयीच्या अतीव आदराने केलेलं हे दुर्मिळ भाषण )
"मित्रहो, भाषणाच्या सुरुवातीला मी इतक्या वर्षांचा निर्ढावलेला माणूस असूनही घाबरून गेलो आहे. भाषणाला मुद्दे नाहीत म्हणून नाही, तर इतके मुद्दे आहेत की काय बोलावं ते समजत नाहीये.
बालगंधर्व या विषयावर मी काय बोलणार? उद्या जर कुणी सांगितलं की ‘चांदणं’ या विषयावर बोला. तर काय बोलणार? आपल्याला बोलता येत नाही हे न कळणारा माणूसच कदाचित बोलू शकेल.
बालगंधर्वाच्या प्रेमाने आजही इतकी माणसे एकत्र येताहेत हाच मुळी एक अद्भुत चमत्कार आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा घट्ट आहे हे सिद्ध करणारी ही गोष्ट आहे. महाराष्ट्राची तीन सांस्कृतिक दैवतं आहेत. शिवाजी महाराज, लो. टिळक आणि बालगंधर्व! महाराष्ट्राने या तिघांवर भरभरून प्रेम केलं. त्यांना विभूतीमत्व दिलं. लोकप्रियता एक वेळ मिळते, पण विभूतीमत्व मिळत नाही. बालगंधर्वाविषयी अधिकारवाणीने बोलावे एवढा मला अधिकार नाहीये आणि त्याची मला जाणीव आहे ही त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट! मात्र एक सांगतो, तो अधिकार मला मिळण्याची शक्यता आहे. बालगंधर्व ज्या मार्गाने कलेकडे गेले तो मार्ग अनुसरला तर आपल्याला त्यांच्याविषयी (निदान) बोलायचा अधिकार मिळू शकतो.
बालगंधर्व हे भक्तिमार्गी कलावंत होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेकडे अगदी प्रेमात पडून पाहिलं. त्यांनी एखाद्या भूमिकेचा विचार केला, चर्चा केली असं मला वाटतच नाही. ‘एकच प्याला’तली सिंधू त्यांनी वाचली, ऐकली आणि ते सिंधू होतच गेले. मात्र त्या तन्मयतेत त्यांनी स्वत:ला वाहू दिलं नाही. ते नुसतेच प्रतिभावंत नव्हते तर उत्तम प्रज्ञावंतही होते. परिष्करणाची तर त्यांना अतिशय आवश्यकता वाटायची. त्यामुळे त्यांची भक्ती आंधळी न ठरता डोळस ठरली.


Balgandharv


Late. P.L.Deshpande

बालगंधर्वाच्या गायकीबद्दल बोलायचं तर भारतीय संगीतातल्या गायकीबद्दलच बोलायला पाहिजे. ते नाटकात गायले म्हणून ती नाटकातली गायकी असं म्हणणं चुकीचं ठरेल. बालगंधर्वाचा यमन आणि भास्करबुवांचा (बखले) यमन यांची जातकुळी वेगळी नव्हती. कारण फक्त निराळं होतं. अर्थात बालगंधर्वाना अजून एक दैवी देणगी लाभली होती. ती म्हणजे त्यांचा स्वर हा जन्मजात भिजलेला स्वर होता. त्याला अंत:करणातल्या प्रेमाच्या ओलाव्याचा स्पर्श होता. बालगंधर्वाची म्हणून एक खास गायकी होती. त्यांच्या सगळ्या भूमिका बघा. त्यातलं जे प्रेम आहे ते सुसंस्कारीत प्रेम आहे. ‘सुखविलासी सोडी न विनया’ अशा प्रकारचं प्रेमाला सुखसंवेदना स्फुरावी असं ते प्रेम आहे. त्यांनी स्त्रीभूमिका केल्या. त्यातून स्त्रीत्वातलं जे जे काही पवित्र, सुंदर, सात्त्विक अशा प्रकारचं आहे त्याचं त्यांनी आपल्या अभिनयातून दर्शन घडवलं. म्हणूनच लोकांची त्यांच्यावर भक्ती जडली.
माझ्या बाबतीत म्हणाल, तर वयाच्या ६-७ व्या वर्षांपासून बालगंधर्वाच्या संस्कारात वाढलेला मी एक मुलगा आहे. (पूर्वी मुलगा होतो- आता राहिलेलो नाही, पण बालगंधर्व म्हटलं की मला माझं मुलगेपणच आठवतं) बालगंधर्वाचं नाटक म्हणजे आमच्या घराचा एक कुळाचारच होता. कुलदैवतेला जसं दरवर्षी जातात तसं आम्ही दरवर्षी बालगंधर्वाच्या नाटकांना जायचो. त्यांची नाटक कंपनी मुंबईत आली की त्यांचं नाटक आपल्या मुलांना दाखवलंच पाहिजे हा संस्कार त्यांच्यावर झालाच पाहिजे अशी जिद्द- आवड- ओढ असलेले आई-वडील मला मिळाले हे मी माझं सगळ्यात मोठं भाग्य समजतो. घरामध्ये एखादं लग्नकार्य असावं अशा तऱ्हेने लोक नाटकाला यायचे. ती नाटकं म्हणजे एखाद्या धार्मिक संस्कारासारखा उत्सव असायचा. असा उत्सव मी परत पाहिला नाही. नाटकांची लोकप्रियता पाहिली. माझीही नाटकं काही लोकप्रिय झाली (चुकून!) पण लोकांचा असा अमाप उत्साह मी पाहिला नाही. एखाद्या लग्नकार्याला जावं तसे कपडे घालून, नटून-थटून लोक नाटक बघायला यायचे. नाटकातल्या सुभद्रेपेक्षा ते बघायला येणारी बाईच जास्त नटलेली असायची. कारण ते फक्त नाटकाला जाणं नसायचं तर एक प्रकारचा उत्तम सांस्कृतिक अनुभव घेणं असायचं. अशा वृत्तीने लोक जायचे आणि बालगंधर्वही अशा वृत्तीने जाणाऱ्या लोकांच्या पदरात पुरेपूर माप टाकायचे.
पडदा वर जायचा. रंगमंचावर लाईटस् पडायचे. ‘प्रभुपदास नमित दास’ म्हणून नांदी सुरू व्हायची आणि खरं सांगतो, ज्या क्षणी- हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत याचा अभिमान वाटतो- असा तो क्षण असायचा. असे असंख्य क्षण ज्या माणसाने आपल्याला दिले त्या माणसाचं नाव नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व! त्यांनी आम्हा सगळ्या लोकांच्या क्षणाचं, आयुष्याचं सोनं करून टाकलं!
नारायणरावांनी जे केलं ते अमूल्य होतं. बिनतोड होतं. ‘नाथ हा माझा’ मधल्या यमनाची काय किंमत ठरवणार तुम्ही? एक गोष्ट सांगतो, नारायणरावांनी जरूर नसलेलं असं काहीच केलं नाही. असं वाटायचं की ही तान इथेच पाहिजे होती. मोठय़ा कलाकारांचे हे वैशिष्टय़ आहे, त्यात दुरुस्ती सुचविता येत नाही. ताजमहालमध्ये थोडी अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणता येत. बालगंधर्वानी जे केलं त्याला पर्यायच नसायचा. शिवाय आपण काहीतरी विशेष करून दाखवतोय असा आविर्भावही त्यात नसायचा. हे घडतंय, हे होतंय असंच वाटायचं. त्यात एक सहज बरोबर जन्मलेला नैसर्गिक भाव असायचा. नाटकात एखादं राजाचं पात्र असतं. त्याने कुणाला शिक्षा केली तरच तो राजा ठरतो असं नाही. त्याचं वागणं बोलणं असं असलं पाहिजे हा राजा आहे. हा भाव तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. बालगंधर्व जे काही करत होते ते सहजतेनं करत होते. तद्रूप होऊन करत होते. ते काहीही सिद्ध करण्यासाठी गात नव्हते. ते फक्त गात होते. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला, अक्षराला, लयीला धरून ते गात होते.
संगीत नाटकं आल्यावर बरेचसे समीक्षक- जे संगीतातले औरंगजेब होते, ते म्हणाले, संगीत आणि नाटक यांचा गोंधळ केला. अहो, संगीताने काय गोंधळ केला, संगीत ही गोंधळ करणारी विद्या आहे का? ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील, पण तो संगीताचा दोष नव्हे. हे म्हणजे फुलांनी पूजेचा गोंधळ केला म्हणण्यासारखं आहे. या लोकांना आपली परंपरा किती माहीत नाही याचं एक उदाहरण सांगतो. एकदा एक महान समीक्षक मला म्हणाले, काय तुमचे ते बालगंधर्व! ते ‘कशी या त्यजू पदाला’ गाणं म्हणत असायचे, तेव्हा तो सिंधूचा बाप नुसता मख्खासारखा उभा! मी म्हटलं, साहेब, सगळं ऑडियन्स ‘कशी या’ गाणाऱ्या बालगंधर्वाकडे तल्लिन होऊन बघत असताना तुम्ही सिंधूच्या बापाकडे कशाला बघत बसलात? म्हणजे नाटक कसं बघावं हे ज्यांना कळत नाही, त्यांना संगीत नाटकांचा परस्परसंबंध कसा कळणार?
जेव्हा गद्य शब्दांची शक्ती संपते तेव्हा काव्य सुरू होतं. गाणं सुरू होतं. आईला जेव्हा वात्सल्याचं भरतं येतं तेव्हा ती मुलाला ‘तो एक नंबरचा चमचा घे. तोंडात घाल’ वगैरे सांगत बसत नाही. ती सरळ ‘घास घेरे तान्ह्य़ा बाळा’ असं गायला लागते. तिला जे म्हणायचं असतं ते सुरांच्या मदतीशिवाय म्हणता येत नाही. कीर्तनातही एखादा नाटय़मय प्रसंग उभा करायचा असेल तर गाण्यांचाच आधार घेतला जातो. कल्पना करा, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलेलं आहे, असा प्रसंग आहे. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतोय. तो गद्यात कितीही वर्णन केला तरी अपुराच पडणार. पण त्याच वेळी कीर्तनकाराने उच्च रवात ‘रथचक्र उद्धरु दे, श्रुतीशास्त्र ये फळाला’ असा स्वर लावला की तो कर्ण, अर्जुन, तो एकंदर प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. प्रसंग सजीव होतो. ‘नाथ हा माझा मोही खरा’च्या प्रसंगी ते आले, त्यांना मी प्रथम पाहिले म्हटल्यावर तिला जे वाटलं, ते तिनं पद्यातच म्हटलं पाहिजे. गद्यामध्ये ती शक्ती नाहीये.
मानापमानातला ‘नाही मी बोलत नाथा’चा प्रसंग घ्या. (बायका जेव्हा ‘काहीतरी बोलू नका’ असं म्हणतात तेव्हा त्यांना ‘काहीतरी बोला’ असं म्हणायचं असतं. स्त्री जेव्हा ‘चला’ म्हणते तेव्हा उठून जायचं नसतं. बसायचं असतं. हे समीक्षकांना कळणार नाही.) ‘नाही मी बोलत नाथा’ हे बालगंधर्व किती प्रकारे सांगतात? ज्यांना गाणं कळत नाही, त्या मूर्ख लोकांनी त्याला ‘दळण घालणं’ म्हटलं. त्यांना कळलंच नाही ते. ‘नाही मी बोलत’ हे ५० वेळा नव्हे तर ५० तऱ्हांनी म्हटलेलं असायचं. एकासारखी दुसरी नाही. दुसऱ्यासारखी तिसरी नाही. उगीच नाही बालगंधर्वाची साथ करताना मी- मी म्हणवणाऱ्या तबलजींची बोटे दुखून येत. लयीतल्या सूक्ष्मातिसूक्ष्म बदलाची त्यांना जाणीव होती.
काहींनी त्यांच्या गाण्यांवर आक्षेप घेतला की तिथे नाटक थांबायचे आणि गवई गात सुटायचे. वास्तवात कुणी गातो का? आता त्यांना काय सांगावं? नाटक ही गोष्टच मुळी अंतरंगातली वास्तवता घेऊन येते. बहिरंगातली नव्हे! बहिरंगातली वास्तवता त्यात येईलच कशी? लोक तिकीट काढून नाटकाला येतात, पडदा वर जातो तिथे प्रॉम्टर असतो. त्यातला शिवाजी, शिवाजीच्या मिशा सगळं खोटंखोटंच असतं. पण हे खोटं नाटक आपल्याला जीवन किती खरं आहे, विविधांगी आहे हे सांगत असतं. नाटकातलं गाणं हे कृत्रिम वगैरे काही नाही. तो त्याचा एक भाग आहे. लंगडीच्या खेळात कुणी म्हटले, दोन पाय असून एका पायाने कशाला धावायचे, तर त्याला काय उत्तर देणार? तो खेळच तसा आहे. तसं नाटकाचं आहे. गाणं नाटक थांबवत नाही. ते नाटक बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं आणि नाटक पुढे नेतं. बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा डेक्कनक्वीनसारखा ठराविक वेळ ठराविक स्टेशनं घेत केलेला (आखीव-रेखीव) प्रवास नसतोच मुळी! तो एका सुंदर उद्यानाचा फेरफटका आहे. त्यातली प्रत्येक सुंदर जागा बघत, सौंदर्यस्थळं निरखत रमतगमत केलेला तो एक उन्मुक्त फेरफटका आहे.
भारतीय संस्कृतीत संगीताला मोठं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आमचा तत्वज्ञानपर ग्रंथ- गीता- हा पद्यात आहे. लग्नामधल्या मंगलाष्टकांना दुसरी (उडती) चाल लावून बघा. लग्न लागण्याऐवजी मोडलं असं वाटेल.

नाटक हा एक यज्ञ आहे. त्यात सगळे कलाकार आपापला हविर्भाग अर्पण करतात. नट येतो. अभिनय करतो. गायक येतात. गातात. नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, तबलजी, सारंगिये येतात. प्रत्येक जण आपली आहुती अर्पण करतो. बालगंधर्वानी आपल्याला काय दिलं? जीवनामध्ये सौंदर्य हे एक मूल्य आहे हे मनावर ठसवलं. सुबकपणे जगणं, सुरेख रीतीने मांडणी, गाणं शिकवलं. बरं हे सर्व अगदी सहज रीतीने शिकवलं. स्त्रीत्वात जे काही मोहक, सुंदर, मधुर आहे ते त्यांनी अभिनयानं दाखवलं. म्हणूनच ५-५ पिढय़ांनी त्यांचा अभिनय बघितला. बालगंधर्व म्हातारे होऊ शकतील, पण लय म्हातारी होणार नाही. त्यांनी मात्रांचा हिशेब बोटांवर नाही घातला. अंत:करणात घातला. म्हणूनच त्यांचे संगीतशास्त्रीय प्रमाद त्यांचे गुण ठरले. त्यांनी भीमपलासात शुद्ध निषाद लावला. इतर कुणी लावला असता तर संगीताच्या रखवालदारांनी ते करणाऱ्याची जीभ कापली असती. बालगंधर्वाच्या बाबतीत हे फक्त तुम्हीच करू शकता, असं म्हणून सर्वानी त्यांचे पाय धरले. एकदा बालगंधर्वाचा षडज् ऐकताना भीमसेन (जोशी) म्हणाला होता, आपल्या तंबोऱ्याच्या भोपळ्यांची भाजी करून खावी! खरं आहे ते! बालगंधर्व फार थोडे आणि सोपे राग गायले. फार मोठे राग गाऊन आपण काही करामत करतोय असं त्यांना दाखवायचंच नव्हतं.
बालगंधर्वानी खूप वेडेपणा (अव्यवहारीपणा) केला. हजार-हजार रुपयांचे शालू घेतले. पण ते नारायणराव बालगंधर्वासाठी नव्हते. तो शालू द्रौपदीचा होता. सुभद्रेचा होता. राजा भीष्मकाच्या राजकन्येचा होता. मायबाप प्रेक्षकांच्या मनावर रुक्मिणी ठसावी म्हणून होता. ते सगळं रंगदेवतेसाठी होतं. प्रेक्षकांसाठी होतं. त्यांची तारीफ करून आम्हाला काय मिळवायचं? त्यांच्या हाती कुठली सत्ता होती? ते मंत्री नव्हते, उपमंत्री नव्हते. क्रेडीट सोसायटीचे चेअरमनही नव्हते की एखादं लोन पास करतील. पण खरं सांगायचं तर त्यांनी इतका आनंद दिला की त्यांचे ऋण फेडताच येणार नाही.
बालगंधर्वाबद्दल बोलणं संपणारच नाही. त्याचा कधी कंटाळा येणार नाही. चांदण्याचा, गंगेच्या ओघाचा, गुलाबाचा, जाईच्या सुगंधाचा कधी कंटाळा येईल का? वल्लभाचार्य म्हणतात, ‘रुपं मधुरम्, गीतं मधुरम्, वचनं मधुरम्, नयनं मधुरम्, हसितं मधुरम्, चरितम् मधुरम्, ललितं मधुरम्, मधुराधिपतये अखिलं मधुरम्.’
गदिमा म्हणाले, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ ते सर्वस्वी खरं आहे. त्यांच्या शंभराव्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचं संकीर्तन करायची मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. कुणीतरी म्हणालं, बालगंधर्वाचा तीन दिवसांचा महोत्सव करावा. मी म्हणतो तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यात सर्वकाळ बालगंधर्वाचा, कलेचा, कलाप्रेमाचा उत्सव साजरा होवो. 
हीच माझी शुभेच्छा !"

- पु.ल.देशपांडे

सौजन्य : समीर सप्रे & मान. जयेंद्र जयंत साळगावकर (कालनिर्णय परिवार)



Friday, 20 March 2015

शाहीर, आपणास भावपूर्ण आदरांजली..

मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपलाय. महाराष्ट्राची लोकधारा आणि ‘जय जय महाराष्ट्र’ महाराष्ट्राभिमान गीतातून महाराष्ट्राची महती पोहचवणारे शाहीर साबळे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून त्यांनी मोलाचं योगदान दिलं.
“गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा..”‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर मूळचे सातारा जिल्ह्यातल्या, वाई तालुक्यातील पसरणी गावचे, जन्म 1923 चा. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचं बाळकडू मिळालं. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा साने गुरूजींशी संपर्क आला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 

1942 ची स्वातंत्र्य चळवळ, गोवा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांमध्ये शाहीर साबळेंनी महाराष्ट्र गाजवून सोडला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या चळवळीत लोकजागृती करण्यात महत्वांचं योगदान होतं हे शाहिरांच्या गाण्यांचं. लोकनाट्यात बदल करून त्यांनी मुक्तनाट्य निर्माण केलं. त्यांनी लिहिलेल्या मुक्तनाट्यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील पहिला प्रयोगही त्यांनी केला.त्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं तर सर्व विक्रम मोडून काढले.
1954-55 मध्ये एच.एम.व्ही. चे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले ते शाहीर साबळेंच. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोकगीतं गोळा करून त्यांनी त्याचं जतन केलं. पद्मश्री, संगित नाटक अकादमीच्या पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘माझा पवाडा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
साबळे हे फक्त शाहीर नव्हते ते उत्तम कवी होते, ढोलकीवादक होते. अभिनेते होते मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, तर शाहीर साबळेंसारखं अशी पावती पु. ल. देशपांडे यांनी त्यांना दिली होती. महाराष्ट्राचा हा बुलंद आवाज आता शांत झाला तरी त्यांच्या पोवाड्यांचे सूर कायम गर्जत राहणार आहेत. एक कलाकार म्हणून शाहिरांचे असणारे अनन्य साधारण योगदान हा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. वारकरी संप्रदायातील असणारे त्यांचे मूळ कुटुंब आणि त्यास मिळालेली लोककलेची अद्भुत जाण, ओव्या रचणाऱ्या आईमुळे लाभलेले शब्दसामर्थ्य याचा वारसा 'शाहिरां'नी सार्थ ठरवला. मायबाप देणे मायबाप रसिकांप्रती त्यांनी कायमच लेणे करून ठेवले. बासरीवर त्यांचे अतिशय प्रेम होते. आपल्या कलेइतकेच प्रेम आपल्या मातृभूमीवर करणारा हा कलावंत होता. 'जातीयवाद की समाजवाद' हा पहिला पोवाडा त्यांनी रचला आणि सर्वाना अचंबित केले. १९४७ पासून शाहीर जनमाणसात 'लोकशाहीर' म्हणून नावारूपास येण्यास सुरुवात झाली. 'आंधळं दळतंय', ' महाराष्ट्राची लोकधारा' या त्यांच्या कलाकृतींना उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. 'अरे कृष्णा, अरे कान्हा', 'विंचू चावला', 'आठशे खिडक्या नवशे दारं', 'दादला नको ग बाई', 'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला' तसेच 'पयल नमन' यांसारखी अनेक गाजलेली लोकगीते त्यांनी या कलाप्रांतास अर्पण केली. शाहिरांचे योगदान अनमोल आहेच पण, प्रेरक देखील आहे. 'शाहीर अमर शेख पुरस्कार' त्यांना लाभला, वास्तविक 'अमर शेख' यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 'दिल्ली'ला दिलेली धडक हा अत्यंत महत्वाचा प्रसंग म्हणून ओळखला जातो, अन त्यांचेच वारस असणारे हे योध्ये कलावंत माणूस म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून किंवा एक जनता कलावंत म्हणून जितके उंचीवर गेले तितकेच त्यांनी रोवलेले लोककलेचे बीज आता तरुण पिढीसमोर असणारा वटवृक्ष झाले आहे. त्यास जोपासण्याचे कार्य करणाऱ्या प्रत्येकास, नवकलावंतास मिळालेले यश आणि महाराष्ट्राच्या समृद्ध, जन्मदत्त लोककलेची झालेली जोपासना हीच शाहिरांना खरी आदरांजली ठरेल. शाहीर, आपणास भावपूर्ण आदरांजली..  महाराष्ट्राच्या या लोकशाहीराला 'युनिटी परिवाराची' श्रद्धांजली.
साभार - आय. बी. एन. लोकमत वेबसाईट.
संपादन : शुभंकर करंडे
©युनिटी मिडिया नेटवर्क २०१५
('युनिटी ग्रुप्स इंडिया'ची स्वायत्त संस्था)
www.unitygroups.in
magazine.unity@gmail.com

नोंद : सदर संपादन 'युनिटी ग्रुप्स इंडिया'च्या संस्थापक अध्यक्षांनी केले आहे. 
सर्वाधिकार राखीव.
कार्यकारी संपादक - हर्षद वैद्य
सह संपादन - प्रतिक जावळे