मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपलाय.
महाराष्ट्राची लोकधारा आणि ‘जय जय महाराष्ट्र’ महाराष्ट्राभिमान गीतातून
महाराष्ट्राची महती पोहचवणारे शाहीर साबळे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 94
वर्षांचे होते. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून
त्यांनी मोलाचं योगदान दिलं.
“गर्जा
महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा..”‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या
कानाकोपर्यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. महाराष्ट्राचे
लाडके शाहीर साबळे. शाहीर मूळचे सातारा जिल्ह्यातल्या, वाई तालुक्यातील पसरणी
गावचे, जन्म 1923 चा. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील
यांच्याकडून त्यांना गायनाचं बाळकडू मिळालं. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा
साने गुरूजींशी संपर्क आला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
1942
ची स्वातंत्र्य चळवळ, गोवा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ
अशा अनेक आंदोलनांमध्ये शाहीर साबळेंनी महाराष्ट्र गाजवून सोडला. पंढरपूरच्या
विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या चळवळीत लोकजागृती
करण्यात महत्वांचं योगदान होतं हे शाहिरांच्या गाण्यांचं. लोकनाट्यात बदल करून त्यांनी
मुक्तनाट्य निर्माण केलं. त्यांनी लिहिलेल्या मुक्तनाट्यांनी अवघा महाराष्ट्र
ढवळून निघाला. मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील पहिला प्रयोगही त्यांनी
केला.त्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं तर सर्व विक्रम मोडून
काढले.
1954-55
मध्ये एच.एम.व्ही. चे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले
ते शाहीर साबळेंच. राज्याच्या कानाकोपर्यातून लोकगीतं गोळा करून त्यांनी त्याचं
जतन केलं. पद्मश्री, संगित नाटक अकादमीच्या पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार
मिळाले. ‘माझा पवाडा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
साबळे
हे फक्त शाहीर नव्हते ते उत्तम कवी होते, ढोलकीवादक होते. अभिनेते होते मराठी
रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, तर शाहीर साबळेंसारखं अशी पावती पु. ल. देशपांडे यांनी
त्यांना दिली होती. महाराष्ट्राचा हा बुलंद आवाज आता शांत झाला तरी त्यांच्या पोवाड्यांचे
सूर कायम गर्जत राहणार आहेत. एक कलाकार म्हणून शाहिरांचे असणारे अनन्य साधारण योगदान
हा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. वारकरी संप्रदायातील असणारे त्यांचे मूळ कुटुंब
आणि त्यास मिळालेली लोककलेची अद्भुत जाण, ओव्या रचणाऱ्या आईमुळे लाभलेले शब्दसामर्थ्य
याचा वारसा 'शाहिरां'नी सार्थ ठरवला. मायबाप देणे मायबाप रसिकांप्रती त्यांनी कायमच
लेणे करून ठेवले. बासरीवर त्यांचे अतिशय प्रेम होते. आपल्या कलेइतकेच प्रेम आपल्या
मातृभूमीवर करणारा हा कलावंत होता. 'जातीयवाद की समाजवाद' हा पहिला पोवाडा त्यांनी
रचला आणि सर्वाना अचंबित केले. १९४७ पासून शाहीर जनमाणसात 'लोकशाहीर' म्हणून नावारूपास
येण्यास सुरुवात झाली. 'आंधळं दळतंय', ' महाराष्ट्राची लोकधारा' या त्यांच्या कलाकृतींना
उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. 'अरे कृष्णा, अरे कान्हा', 'विंचू चावला', 'आठशे
खिडक्या नवशे दारं', 'दादला नको ग बाई', 'विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला' तसेच
'पयल नमन' यांसारखी अनेक गाजलेली लोकगीते त्यांनी या कलाप्रांतास अर्पण केली. शाहिरांचे
योगदान अनमोल आहेच पण, प्रेरक देखील आहे. 'शाहीर अमर शेख पुरस्कार' त्यांना लाभला,
वास्तविक 'अमर शेख' यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 'दिल्ली'ला दिलेली धडक हा अत्यंत
महत्वाचा प्रसंग म्हणून ओळखला जातो, अन त्यांचेच वारस असणारे हे योध्ये कलावंत माणूस
म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून किंवा एक जनता कलावंत म्हणून जितके उंचीवर गेले तितकेच
त्यांनी रोवलेले लोककलेचे बीज आता तरुण पिढीसमोर असणारा वटवृक्ष झाले आहे. त्यास जोपासण्याचे
कार्य करणाऱ्या प्रत्येकास, नवकलावंतास मिळालेले यश आणि महाराष्ट्राच्या समृद्ध, जन्मदत्त
लोककलेची झालेली जोपासना हीच शाहिरांना खरी आदरांजली ठरेल. शाहीर, आपणास भावपूर्ण आदरांजली..
महाराष्ट्राच्या या लोकशाहीराला 'युनिटी
परिवाराची' श्रद्धांजली.
साभार
- आय. बी. एन. लोकमत वेबसाईट.
संपादन
: शुभंकर करंडे
©युनिटी मिडिया नेटवर्क २०१५
('युनिटी ग्रुप्स इंडिया'ची स्वायत्त संस्था)
www.unitygroups.in
magazine.unity@gmail.com
नोंद : सदर संपादन 'युनिटी ग्रुप्स इंडिया'च्या संस्थापक अध्यक्षांनी केले आहे.
नोंद : सदर संपादन 'युनिटी ग्रुप्स इंडिया'च्या संस्थापक अध्यक्षांनी केले आहे.
सर्वाधिकार राखीव.
कार्यकारी संपादक - हर्षद वैद्य
सह संपादन - प्रतिक जावळे