Friday, 23 August 2013

कोलेस्टरॉल

मानवी आरोग्य जर सुदृढ असेल तर त्याचे जीवन देखील सुखमय होते! आज आपण याचीच चर्चा करूया!
रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास हृदयविकार वा हृदयाशी संलग्न अशा रोगांचा धोका संभवतो. हे प्रमाण वाढण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यातील अनेक कारणे आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहेत. 
कोलेस्टरॉल हा शब्द ऐकला की सगळ्यांचे कान टवकारतात. हृदयविकाराशी असलेला त्याचा संबंध हे त्यामागचे प्रमुख कारण. रासायनिकदृष्ट्या कोलेस्टरॉल हे मेद आहे. हातात घेतल्यास ते मेणासारखे वाटेल. त्याचा रंगही मेणासारखा पिवळट पांढरा असतो. कोलेस्टरॉल शरीरात रक्ताच्या माध्यमातून फिरत असते. मेद असल्यामुळे ते रक्तात विरघळत नाही; पण त्याचा शरीरात मुक्त संचार आवश्यक असतो. त्यामुळे कोलेस्टरॉलचे रेणू मेदप्रथिनांच्या मोळीत बांधले जातात. 
ही मोळी रक्ताशी एकजीव होते व मेदप्रथिनयुक्त कोलेस्टरॉल त्याच्या इष्टस्थळी पोहोचविले जाते. या मोळीला शास्त्रीय परिभाषेत ‘अपोलिपो प्रोटीन्स’ असे संबोधतात. यात कोलेस्टरॉलसोबतच ट्रायग्लिसराइड्स, फॉस्फोलिपीड व प्रथिन हे घटक एकत्रित केले जातात. यातील ट्रायग्लिसराइड्स म्हणजे तीन मेदाम्लांचे रेणू व ग्लिसरॉल यांचे संयुग. या ट्रायग्लिसराइड्सचा शरीराला उर्जास्त्रोत म्हणून उपयोग होतो. पण आहारात यांचे प्रमाण अधिक असल्यास त्याचे अनिष्ट परिणाम रोहिणी या शुद्ध रक्तवाहिन्यांना,व पर्यायाने हृदयाला भोगावे लागतात.
उच्च घनतेच्या मेदघटकांत (एच.डी.एल.) प्रथिने अधिक प्रमाणात असतात, तर मेदांचे प्रमाण कमी असते. कमी घनतेच्या मेदघटकात (एल.डी.एल.) प्रथिन कमी प्रमाणात, व मेद अधिक प्रमाणात असतात. यकृतात तयार होणाऱ्या कोलेस्टरॉलची शरीरातील पेशींमध्ये ने-आण कमी घनतेच्या मेदघटकाद्वारे केली जाते. या कमी घनतेच्या मेदघटकांचे रक्तातील प्रमाण वाढल्यास कोलेस्टरॉल रोहिणीमध्ये साचू लागते व त्यातून हृदयरोग होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच या कमी घनतेच्या मेदघटकातील कोलेस्टरॉलला ‘वाईट किंवा हानिकारक कोलेस्टरॉल’ संबोधतात. 
रक्तात त्याचे योग्य प्रमाण राखणे आपल्या हाती असते. आहारात मेदयुक्त घटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास त्याचा फायदा होतो. उच्च घनतेच्या मेदघटकांत प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. या घटकाचे कार्य कोलेस्टरॉलची ने-आण करणे नसून शरीरात ठिकठिकाणचे जास्तीचे कोलेस्टरॉल गोळा करणे हे असते. गोळा केलेले सर्व कोलेस्टरॉल या घटकाद्वारे यकृताकडे सुपूर्द केले जाते. तेथे शरीराच्या आवश्यकतेनुसार त्याचे रिसायक्लेशन तरी होते किंवा विघटन घडवून आणले जाते. रक्तातील या उच्च घनतेच्या मेदघटकांचे अधिक प्रमाण म्हणूनच हृदयाच्या दृष्टीने चांगले वा हितकारक समजले जाते. या प्रकारच्या मेदप्रथिनांत ऑक्सिडेशनविरोधी तत्वे असतात. नियमित व्यायामामुळे उच्च घनतेच्या मेदप्रथिनांचे प्रमाण रक्तामध्ये अधिक राखले जाते, तर धूम्रपान व लट्ठपणामुळे ते कमी होते. आहारात मेदाचे प्रमाण अधिक असल्यास उच्च व कमी घनतेच्या मेदप्रथिनांचे प्रमाण रक्तामध्ये अधिक असते. आहारातील मेदाचे प्रमाण कमी केल्यास दोन्ही मेदप्रथिनांचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच चौरस आहार महत्त्वाचा ठरतो.
कोलेस्टरॉलची शरीराला अनिवार्य गरज असल्याने त्यासाठी फक्त बाहेरच्या रसदीवर अवलंबून रहावे लागू नये, अशी योजना निसर्गाने केली आहे. ते शरीरातच यकृतात बनविले जाते. आपण कोलेस्टरॉलरहित आहार स्वीकारला तरीही आपल्या शरीरात रोज एक ग्रॅम कोलेस्टरॉलचे उत्पादन होतच असते. या उत्पादनावर आपल्या शरीराचे संपूर्ण नियंत्रण असते. फ्रीजमध्ये जसे तापमानावर नियंत्रण ठेवले जाते, तसाच काहीसा हा प्रकार. 
फ्रीजमधील तापमान विशिष्ट बिंदूच्या खाली गेले की त्यातील तापनियंत्रक सक्रिय होतो व काँप्रेसरला होणारा विजेचा प्रवाह खंडित करतो. तापमान त्या बिंदूच्या वर गेले की नियंत्रकाद्वारे पुन्हा प्रवाह सुरु केला जातो. तसाच प्रकार कोलेस्टरॉलबाबत होतो. पेशींमधील कोलेस्टरॉल ठराविक मर्यादेच्या खाली गेले की ते एका विशिष्ट प्रथिनाच्या लक्षात येते व ते प्रथिन पेशीमधील जनुकांपैकी कोलेस्टरॉल निर्मितीस जबाबदार असलेल्या जनुकपुंजास उद्दीपित करते व तत्काळ कोलेस्टरॉलच्या उत्पादनास सुरुवात होते.
रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास हृदयविकार वा हृदयाशी संलग्न अशा रोगांचा धोका संभवतो. हे प्रमाण वाढण्याची कारणे अनेक असू शकतात; पण मुख्य कारणांमध्ये मदिरापान,धूम्रपान, बैठे काम, व्यायामाचा अभाव व बाजारी झटपट खाऊ नेहमी नेहमी खाणे यांचा समावेश होतो. गाड्यांवर किंवा हॉटेलात मिळणारे वडे, समोसे, भजी असे तळलेले पदार्थ म्हणजे अधिक कोलेस्टरॉल हे समीकरणच आहे. 
वारंवार गरम व थंड होणाऱ्या कढईत स्वयंपाकी आहे त्याच तेलात नव्याने तेल ओतत असतात तेव्हा त्या तेलातील असमृक्त मेदाम्लांचे रुपांतर संपृक्त मेदाम्लांमध्ये होत असते व त्याचा अनिष्ट परिणाम वाढलेल्या कोलेस्टरॉलच्या व ट्रायग्लिसराइड्सच्या रुपात दिसून येतात. त्यातूनच हृदयविकार उद्भवतात. जे शरीर आपल्यासाठी अमूल्य असे आहे त्याची काळजी घेणे आपले आद्य कर्तव्य आहे, ह सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवे.
हृदयविकार टाळण्यासाठी...
> आहारात फळे व भाज्यांचा वापर वाढविणे.
> कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. नुसते उपास करून किंवा कोलेस्टरॉल विरहीत जेवण करून कार्यभाग साधणार नाही, हे जरूर लक्षात ठेवावे.
> व्यायाम नियमितपणे व पुरेसा करणे महत्वाचे आहे.
> नियमितपणे ठराविक तास झोप अत्यंत महत्त्वाची आहे.
> झटपट बाजारी खाऊ टाळावा. पावभाजी, वडे, समोसे कधीतरी सटीसहामासी ठीक; पण ती लक्ष्मणरेषा ओलांडू नये!
> शरीराचे वजन नियंत्रणात ठेवावे
> धूम्रपान, मदिरापान व इतर अंमली पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहाणे आपल्याच हाती आहे, ते निष्ठेने केले पाहिजे.
म्हणूनच तर म्हणतात ना.. आरोग्यं धनसंपदा !!
आपणास देखील निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना!

मुंबई                                                                                                                       - अनामिक 
२३ ऑगस्ट २०१३                                                                                  

( सदर ब्लॉग सुहास पाडगावकर, रा.विलेपार्ले , मुंबई यांनी पाठवलेल्या ई-मेल मधून साभार घेण्यात आला आहे! या ब्लॉग करिता Magazine World of UGI वा Magazine World of UGI चा कोणताही संबंधित कोणत्याही आणि कसल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही!)

No comments:

Post a Comment