Saturday, 17 August 2013

संस्कृती Culture!!

निसर्ग ! एक चमत्कार !किती बुद्धिवान कलावंत आहे हा! नाजूक हृदय , त्याला बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित ठेवलं . शरीराचा राजा मेंदू! त्याला डोक्याच्या कवटीमध्ये आढळ स्थान दिलं... अशाच या निसर्गाने एक एक शृंखला जोडून एके एक व्यवस्था निर्माण केली आणि तिचा चलन वलन नीट व्हावं म्हणून त्या श्रुन्खलेभोवती संस्कृतीचा रेशमी गोफ विणला!
भूक लागल्यावर जेवणे ही प्रकृती, पण आपल्या घासातला घास  दुसऱ्याला देणे ही संस्कृती! हृदय आणि बुद्धी यांची पूजा करणारी संस्कृती. संस्कृती म्हणजे सहानुभूती , विशालता , सत्याचे प्रयोग,स्थाणू न राहता ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे, संस्कृती म्हणजे गरज! जगात जे काही सत्य , शिव आणि सुंदर आहे ते सारे संस्कृती मध्ये येते! संस्कृती म्हणजे महानता! संस्कृती म्हणजे प्रेमाला दोहुन काढलेले दुध! सम अधिक कृती म्हणजे संस्कृती!' सर्वेषाम अविरोधेन ब्रम्हकर्म समारंभे ' असा उच्चार करणारी ती संस्कृती! संस्कृती म्हणजे ब्राम्हमुहुर्तावर केलेले स्नान ! संस्कृती म्हणजे सागर आणि अंबर, प्रकाश आणि कमळ, चित्त आणि चैतन्य! याचाच अर्थ अंतातून अनंताकडे, अंधारातून प्रकाशाकडे,विकलातून सकलाकडे, मलातून  विमलाकडे, चिखलातून कमळाकडे, विरोधातून विकासाकडे,विकारातून विवेकाकडे! पाताळातून स्वर्गाकडे!गोंधळातून व्यवस्थेकडे! आरडाओरडीतून संगीताकडे जाणे म्हणजे संस्कृती!संस्कृती सर्व मानवजातीचा मेळा घेऊन मांगल्याकडे जात असते! संस्कृती म्हणजे शिवत्व! आणि संस्कृती म्हणजे निर्भयता!
भारताच्याच काय तर संपूर्ण जगाच्या नसानसात संस्कृती आहे. कोणत्याही संस्कृतीचं वैभव हे सच्चितनन्द च्या वेशीला भिडणारं असतं. आपण ज्याला कधी कधी विकृती म्हणतो, ती सुद्धा संस्कृतीच आहे! कारण, विकृतीचा सकारात्मक अर्थ हा विशेष कृती असा होतो! There is not like an evil ; its just different ,हे वचन संस्कृतीभेदाची रेषाच पुसून टाकते. कारण, संस्कृती मध्ये फरक पडला कि जो बलवत्तर असतो तो तथाकथित सुसंस्कृत ठरतो! अन जो दुर्बल असतो तो 'असंस्कृत' ठरतो! म्हणूनच , आर्य द्रविडना, इंग्रज भारतीयांना असंस्कृत म्हणायचे; पण त्यांचीही एक संस्कृती असू शकते याचा विसर त्यांना पडला असावा! आदिम काळात माणूस अप्रगत होता!अग्नीच्या शोधापासून त्याने त्यांची संस्कृती विकसित करायला सुरुवात केली!गरज हि शोधाची जननी आहे, हे मानवाला तंतोतंत लागू पडते! मग वैदिक धर्म आला, संस्कृतीचा वटवृक्ष फांद्या , विस्तीर्ण करायला लागलं, मग धर्माचं तत्वज्ञान आले. संस्कृतीच्या सहाय्याने माणूस भावना जोपासत गेला. आणि नित्य शुद्ध - बुद्ध - मुक्त - घनरूप - ब्रह्मस्वरूप अशा परमात्म्याला हि आकार देत गेला. नंतर प्रगत तंत्रज्ञान आल्याने मानवाचे कल्याण होत गेले. जुनी युद्ध संस्कृती आली. आता माणूस चंद्रावर जाऊन आला आहे. आणि मंगळाची स्वप्न पाहतो आहे! पूर्वी ' बाबावाक्याम प्रमाणाम' म्हणणारी विद्यार्थ्यांची संस्कृती पण बदलते आहे! आणि आत्ताचा विद्यार्थी चौकस झाला आहे!
पण जर विचार करा... आदिम काळापासून ही संस्कृतीच प्रगत झाली नसती तर ???
आपण ज्या अवस्थेत आहोत, ती अवस्थाच आपल्याला प्राप्त झाली नसती.कारण, उत्क्रांतीच्या काळात आदिमानवाच्या जगण्याच्या संस्कृतीने 'शोध' या संस्कृतीला जन्म दिला. आणि तीच नसती तर आपली पुढची अवस्थाच विसरा!मुळात संस्कृती म्हणजे काय? जिच्यामुळे आपल्याला जगावंसं वाटतं ती संस्कृती!एक विरोधाभासाचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या समाजात लिंग आणि योनीचा उल्लेख अश्लीलतेने केला जातो, पण; संस्कृतीमुळे त्यानाही शिवलिंग आणि नवरात्रात घटाच्या रुपात पुजल जातं! अहो, छान वातानुकुलीत कारमध्ये बसलेल्यांना वाटतं कि बसमधल्या  लोकांची बस मधली संस्कृती किती गचाळ आहे पण, हे लक्षात घेत येत नाही की, ती पण एक पद्धत आहे, एक संस्कृती आहे. तिकडे वागण्याचे काही नियम आहेत.किंबहुना एक उदात्त संभावना आहे. मुळात मला एका गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावसं वाटतं कि, हिंदू , इस्लाम, ख्रिस्त , बौद्ध , जैन हे धर्म नव्हेतच, तर एक विचारधारा आहेत. त्यांचा पाया संस्कृती आहे.नंतरच्या काळात प्रत्येकजनानी संस्कृतीच्या या विशाल वटवृक्षाच्या फांद्या कापून घेतल्या आणि माझं काय ते खरं असं सांगायला सुरुवात केली.
धर्म आणि संस्कृती या दोन अविभाज्य गोष्टी आहेत.आणि धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. धर्म म्हणजे जगण्याची रीत. रोज स्नान संध्या करणे म्हणजे धर्म असेल तर , अशा धर्माचा उपयोग तो काय?
हल्ली काही नव्या संस्कृतीचा शिरकाव माणसाच्या आयुष्यात झाला आहे. कॉलेज जीवनातील कट्टा संस्कृती,शेजारभाव जपणारी चाळ संस्कृती, पांढरपेशा समाजाची झालर असणारी सोसायटी; ही संस्कृती गुलाबाच्या कळीसारखी प्रेम संस्कृती , नात्यांच्या बंधांची संस्कृती, प्रत्येक प्रदेशाची खाद्य - नृत्य - वेशभूषेची संस्कृती, प्रत्येक कुटुंबाची एक स्वतंत्र संस्कृती , देशाची संस्कृती, एखाद्या भाषेची संस्कृती , विचार आणि फटकार्यांची संस्कृती, अद्वैताची ब्रह्मरूप संस्कृती, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं म्हणणारी संस्कृती,कुंचल्याची संस्कृती, नवनवोन्मेष अशा निसर्गाची संस्कृती , शब्दांची संस्कृती , एका संघाची संस्कृती, तसंच एका संघटनेची संस्कृती,मित्राच्या प्रेमाची संस्कृती, एवढंच काय तर वहीच्या शेवटच्या पानाची ही एक विशिष्ठ संस्कृती असते, आणि या सगळ्या संस्कृतीचा मिलाफ म्हणजे,.... जगण्याची संस्कृती!!!
संस्कृती मानवाला एक शिस्त घालून देते. तिच्यात कर्मकांड किंवा बंधन नाही.तिच्यात समजूतदारपण आहे. आपण तृतीयपंथीयांची संस्कृती समजून घेत नाही, यात आपला दोष की संस्कृतीचा?? आपण केवळ ग्रामीण प्रश्नांना जाऊन चुचकारतो किंवा गोंजारतो , पण त्या प्रश्नांच्या हृदयाला कोणीच का भिडत नाही??
संस्कृती, समाज आणि परंपरा या एकात एक गुंतलेल्या आणि गुंफलेल्या संकल्पना आहेत. त्यांचा गुंता केला तो आपण... सध्याच्या परिस्थितीत असंस्कृतपणाचा पेव वाढलंय. किंबहुना,त्याला परंपरेची झालर लावण्यात येते आहे. यशाच्या गुणवत्तेपेक्षा त्याचा आकार महत्वाचा ठरतोय. या संकल्पना उदात्त आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे सच्चिदानंदाच्या वेशीला भिडणाऱ्या आहेत. चुकीचा अर्थ लावतोय तो आपण.. चल तर 'इंडिया'तला 'यंग भारत' शोधताना संस्कृती विस्मृतीत जाणार नाही याचीही दाखल घेऊया!


-मनिष वाळवेकर
रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई
निवास - वरळी, मुंबई              www.magazineindia.webs.com 

No comments:

Post a Comment