Friday, 27 September 2013

Mile Sur Mera Tumhara - Ashok Patki

पत्की काकांबरोबर 'रुईया'त रंगला

 'मिले सूर मेरा तुम्हारा'!


रामनारायण रुईया कॉलेज,
विशेष प्रतिनिधी :२६ सप्टेंबर
सुगम संगीतात मानाचे स्थान असलेले श्री अशोक पत्की यांनी "मिले सूर मेरा तुम्हारा" पासून एक भावनिक संगीत दिग्दर्शक म्हणून आपला पाया भक्कम केला. नंतर मराठी नाटकाची शीर्षक गीते, आभाळ माया, वादळवाट, अवघाची संसार अशा अनेक रचना त्यांनी सुरेल पद्धतीने संगीतबद्ध केल्या आहेत. झंडु बाम, लिज्जत पापड आणि संतूर यांसारख्या अनेक जिंगल त्यांचे प्रसिद्ध आहेत . चाळीस वर्षापासून ते जिंगल, नाटक, चित्रपट व मालिका यांना संगीत देत आहेत.
अशोक पत्की यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अवर्णनीय आहे. त्यांनी त्यांच्या आ-ता पर्यन्तच्या कारकिर्दीत ५०० भावगीते, २५० नाट्यसंगीत, ५० चित्रपट संगीत २५० मालिकांचे पार्श्वगायन केले आहे व ६००० पेक्षा जास्त जिँगल्स रचली आहेत.
"संचारी" ही बंगाली संगीत पद्धती प्रथमच अशोक पत्की यांनी महाराष्ट्रात आणली. या नवीन संगीत पद्धतीची त्यांनी महाराष्ट्राला ओळख करून दिली व आपली संगीत क्षेत्रात नवीन ओळख निर्माण केली .

 विविध अशा मानाच्या १४ पुरस्कारांचे विजेते असणारे हे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व!सर्वाना आपलेसे वाटणारे 'पत्की काका'! यांच्या वंदनीय आणि स्पृहणीय कारकीर्दीमध्ये लवकरच एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे! आणि तो म्हणजेच, २०१३ सालचा महाराष्ट्र राज्य शासनाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' आपल्या 'पत्की काका'ना दिनांक २८ सप्टेंबर २०१३ रोजी मुंबईच्या 'रवींद्र नाट्यमंदिर' येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे! याच शुभमुहुर्ताच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक आणि रसिकजनांची परंपरा लाभलेल्या माटुंग्याच्या 'रुईया महाविद्यालय'मध्ये नुकताच या अष्टपैलू संगीतकाराचा सुरमयी प्रवास उलगडून दाखवणारा 'मिले सूर मेरा तुम्हारा' हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. स्वतः पत्की काकांच्या सपत्नीक  उपस्थितीत संपन्न  झालेल्या या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.
'रुईया महाविद्यालयातील' प्राध्यापिका सौ.गौरी बेळगावकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम निर्माण झाला. पत्की काकांसारख्या साध्या , सरळ , समृद्ध , मिश्किल आणि सदाबहार व्यक्तिमत्वाला या माध्यमातून सलाम करताना निरतिशय आनंद आणि आदरपूर्वक अभिमान दिसून येत होता. प्राध्यापक विक्रम करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिले सूर मेरा तुम्हारा' या कार्यक्रमाचा रंगमंच उभा झाला. याच मंचावर 'पत्की' काकांशी मनमुराद गप्पांचा आस्वाद रसिकांनी घेतला. सुयोग्य निवडलेल्या गाण्यांनी आणि रेपिड फायर सारख्या नव्या प्रयत्नांनी मुलाखतीसोबत कार्यक्रमाला नवी उंची प्राप्त करून दिली. शीर्षकगीते असोत किंवा याच बादशहाच्या जिंगल्स ... सुगम संगीत असो किंवा नाटक- चित्रपट क्षेत्रातली पत्की काकांची मुशाफिरी ... संगीतकार म्हणून सर्वाना सुपरिचित असणारे पत्की काका एक आस्वादक आणि अभ्यासू असे दिलखुलास गीतकार देखील आहेत आणि याचेच प्रातिनिधिक  उदाहरण म्हणजे राधा हि बावरी सारखे अल्बम आणि त्यांची मासे खाण्याची आवड ! 
Hon. Ashok Patki
'रुईया'च्या शिस्तबद्ध आणि नियोजित अशा कार्यपद्धतीचा याही कार्यक्रमात प्रत्यय येत होता. रंगमंचाची मोजकी सुरेख सजावट, सक्षम तंत्र व्यवस्था, उत्कृष्ट  रंगमंच व्यवस्था , उत्तम स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. क्र्याक्रमची सारी सूत्रे 'मनिष वाळवेकर' आणि 'सानिका कुळकर्णी' यांनी सक्षम रित्या सांभाळली.
आदिनाथ पाटकर, पियुष कदम , अथर्व कुलकर्णी, मयुरेश शेर्लेकर, विनय चेउलकर, चंद्रकांत पांचाल यांची साथ संगत तसेच, बिपीन कुलकर्णी आणि त्यांच्या सहाय्यकांची ध्वनिप्रणालीआणि त्यातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ओंकार इनामदार , शाल्मली सुखटणकर, अद्वैता लोणकर , देवश्री गोलाम्बरे, सागर साळी आणि प्रथमेश कविश्वर यांचे सूर ... दरम्यान पत्की काकांनी मधेच गायलेले एखादे गाणे किंवा त्याचा अंतरा.. सारेच संगीतमय वातावरण.. वृन्दावनी सारंग असेल किंवा वादळवाट, माझिया प्रियाला प्रीत कळेना सारखी शीर्षकगीते , सजल नयन सारखे शास्त्रीय बाजाचे गीत असेल किंवा गोविंदा गोपाळा सारखे  लेटेस्ट गाणे .. झंडू बाम सारखी जिंगल असो किंवा सारंगा रे सारखी चित्रपट गीते ... सारा माहोल पत्की काकांच्या सुरावटीमुळे श्रवणीय झाला होता.
याच कार्यक्रमाला 'रुईया'चा माजी विद्यार्थी आणि आयडिया सा रे ग म प चा उपविजेता 'मंगेश बोरगावकर' याची उपस्थिती आणि गायन रसिकांना आपलेसे करून गेले.
प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी पत्की काकांचे आणि त्यांच्या पत्नींचे स्वागत केले.आपल्या मनोगतात पत्की काकांचा गौरव करताना 'रुईया'च्या संगीत क्षेत्रातील परंपरेचा आणि योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. याच खास कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ.आर. टी. साने हे देखील आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता पत्की काकांच्या प्रसिद्ध 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताने झाली. वेळच्या वेळी मिळणाऱ्या टाळ्या आणि वन्स मोर यातूनच एकूण कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा प्रत्यय येतो.
रोहन नागोठ्कर, पार्थ मयेकर, यद्नेश जोशी आणि सौरभ महाजन यांची छायाचित्रणाची टीम तर उर्वी सुकी , नेहा पांडव, तन्मय दुर्वे यांची बेकबोन टीमचा देखील यशस्वी आयोजनात आणि नियमनात सहभाग होता. अशा शानदार खास कार्यक्रमाची आठवण 'रुईया'च्या स्मृतीमध्ये आणि रसिकांच्या मनाच्या कुपीत नक्कीच राहील यात शंका वाटत नाही.

मुंबई                                                                                                                           - शुभंकर करंडे 
२७ सप्टेंबर २०१३                                                                                                रामनारायण रुईया कॉलेज 


 Blog Code - B22
 Writer Code - 01
 Dated on 27th Sept. 2013

 © Magazine World of UGI 2013
All rights are reserved!

1 comment: